अखेर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वाजले बिगुल;5 फेब्रुवारीला महाराष्ट्रात मतदान, निकाल कधी?
(निलेश गायकवाड)
राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारी रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. महापालिकांसाठी प्रचाराचा आज (१३ जानेवारी) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राज्यात घडामोडींना वेग आला आहे. असं असतानाच आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे.
“राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीबाबत माहिती देण्यासाठी आज ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण आहे, अशा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये निवडणुका घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. त्यामुळे त्या अनुषंगाने राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांमध्ये निवडणूक घेण्याबाबतची माहिती या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात येत आहे”, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी दिली आहे.
कोणत्या जिल्हा परिषदांची निवडणूक होणार?
कोकण विभाग : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
पुणे विभाग : सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
मराठवाडा विभाग : छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर
“जिल्हा परिषदांच्या या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला दोन मत देणे बंधनकारक आहे. त्यातील एक मत जिल्हा परिषदेसाठी आणि एक मत पंचायत समिती गणासाठी द्यावं लागेल. तसेच या निवडणुकीसाठी नामनिर्देश प्रतिक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने राबविली जाणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
जिल्हा परिषदांच्या निवडणूक कार्यक्रम कसा असेल?
नोटिफिकेशन : १६ जानेवारी रोजी निघणार
उमेदवारी अर्ज : १६ जानेवारी २०२६ ते २१ जानेवारी
अर्जाची छाननी : २२ जानेवारी २०२६
अर्ज माघारी : २७ जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंत
अंतिम यादी व चिन्ह वाटप : २७ जानेवारी दुपारी ३.३० नंतर
मतदान : ५ फेब्रुवारी रोजी पार पडणार
मतमोजणी : ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता.