महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालाय तमाशाचा फड !
‘सहा काळी पाने” अशी या कालखंडाची नोंद होईल.
गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाने अप्रतिष्टेची निचतम पायरी गाठली आहे. या राजकारण्यापेक्षा गोलपिठा परवडला. कारण तिथे उघडपणे शरीर विक्रीचा व्यवसाय केला जातो. पांढरपेश्यांचा आव आणला जात नाही. मात्र सद्याचे राजकारणी प्रेम एका बरोबर, साखरपुडा दुसऱ्या बरोबर तर लग्न तिसऱ्या बरोबर आणि हनिमून चवथ्या बरोबर करतात. मूळ पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जातात, नंतर उमेदवारी तिसऱ्या पक्षाकडून व पराभूत झाल्यावर विधान
परिषदेसाठी चवथ्या बरोबर जातात. असे अनेक राजकारणी सापडतील.त्यांना हिंदीत हरजाई तर मराठीत वेश्या म्हणतात. अश्या लोकांना जेव्हा
राजकारणात प्रतिष्ठा प्राप्त होते, तेव्हा पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येच्या कंठी मणिहार! या म्हणीची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
एकनाथ शिंदे यांना “कुऱ्हाडीचा दांडा” बनवून मातृपक्ष असलेल्या शिवसेनेवर कुठाराघात करायला लावल्या पासून राजकारणाचे अध:पतन सुरू झाले.प्रथम, पक्षप्रमुख दुर्घर दुखण्याने आजारी असताना त्याचा गैरलाभ घेत ४० आमदारासह पलायन करून सुरत गाठली, नंतर गुवाहाटीला कामाख्या देवीला प्रसन्न करण्यासाठी अघोरी विद्येने पूजा अर्चा केली, नंतर गोवा मार्गे लपत- छपत मुंबई गाठली व भाजपा या कथित महाशक्ती (महाकपटी ) च्या मदतीने उद्धव ठाकरेंच्या शासनास सुरुंग लावून अवघे ४० आमदार असताना मुख्यमंत्री पद गटवले. २८८ आमदारांच्या विधानसभेत ४० पळपुट्या आमदारांचा मुखीया मुख्यमंत्री होतो, यावरूनच राजकारणाच्या निचपणाची प्रचिती आली.
त्यानंतर गेली तीन वर्षे महाराष्ट्राने जे राजकारण अनुभवले ते भयानक होते. विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांनी घेतलेले निर्णय पक्षपाती व लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवणारे होते. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही फुटीर गटाला अनुकूल निर्णय घेतले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्रतेच्या प्रकरणी पुन्हा पक्षपातीपणा केला. पुढे जाऊन सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष व राज्यपालांचे निर्णय कसे चुकीचे होते, विधानसभेचे अधिवेशन कश्या चुकीच्या पद्धतीने घेतले, प्रतोदांची निवड कशी चुकीची होती, यासारख्या अनेक अनियमितत्तावर ताशेरे ओढले.या बद्दल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या बाबत कमालीची आदर भावना निर्माण झाली होती. सरन्यायाधीश या प्रकरणी नक्कीच न्यायनिवाडा करून लोकशाहीची बूज राखतील, अशी आशा निर्माण झाली होती. संपूर्ण देशाचे त्या ऐतिहासिक निर्णयाचे वेध लागले होते. परंतू सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनीही हे प्रकरणात सेवा निवृत्ती पर्यंत “तारीख पे तारीख” करीत प्रलंबित ठेवत लोकशाहीची बूज राखली नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा भ्रमनिराश झाला. राजकारण्यांनी लोकशाहीचे चारही स्तंभ पोखरून टाकल्याची भावना दृढ झाली.
एक अपात्र व असंवैधानिक सरकार अडीच वर्षे “सुखनैव” कारकिर्द पूर्ण करू शकले व या कालावधीत अनेक चुकीचे निर्णय घेतले. त्यामुळेच सर्वार्थाने लोकशाही “विधवा” झाली.
या नंतर ज्या निवडणुका झाल्या, त्यात EVM चा गैरवापर करून अपात्र राजकारणी बहुमतांनी निवडून आले. महाराष्ट्रात आलेल्या सत्ताधारी आमदारांचे मनोबल बुलंद झाले. त्यांना सत्तेचा माज आला. यामुळेच अनेक आमदारांनी कायदा हातात घेण्याचा सपाटा लावला. अधिकाऱ्यांना मारहाण, कार्यालयाची तोडफोड, अनैतिक संबंधांची प्रकरणे उघडकीस येऊ लागली. भर रस्त्यात चुम्मा देणारी महिला नेता, काय ते ढुंगण काय तो दांडा! म्हणणारी महिला नेता असते. धनंजय मुंडेचे प्रेम प्रकरण, अश्लील चाळे करणारा तोतऱ्या तोमैया,
अशी किती तरी लाज्जस्पद प्रकरणे याच कालावधीत उघडकीस आली.
नव्याने सत्ता मिळताच यांना सत्तेचा खूप माज आला. संजय गायकवाड यांचे टॉवेल बनियनवर आमदार कॅन्टीन मध्ये जाऊन कर्मचाऱ्यांस केलेली बेदम मारहाण गावंढळ व विकृतपणाचे लक्षण आहे. वरून पश्चातापचा लावलेश नाही. झालीच तर एखादी NC होईल! हा माजूरडेपणा शिंदेशाही मुळेच आला. दुसरे महाशय शिंदेशाहीचे पाईक संजय शिरसाट, चड्डी बनियानवर मौजमजा करीत व धूम्रपान व मद्यपान करीत असताना, नोटांनी भरलेली ब्याग त्यांच्या बेडरूम मध्ये असल्याचे सर्वांनी पहिले. त्यापाठोपाठ महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे कामकाजात लक्ष केंद्रित करण्या ऐवजी मोबाइलवर चक्क रम्मी खेळत असल्याचा व्हिडीओ समोर आला. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत असंवेदनशील असलेले व वाहयात विधाने करणारे कृषिमंत्री रम्मी खेळण्यात मग्न असल्याचे पाहून महाराष्ट्र हादरला. लाखोंचे मानधन व भत्ते घेणारे मंत्री व आमदार किती बेजबाबदार आहेत! हे या निमित्ताने दिसून आले. या आमदार वा मंत्र्यांवर कारवाई करण्याची धमक ना त्यांच्या पक्ष नेत्यात आहे, ना मुख्यमंत्र्यात आहे. सत्तेचा व पैश्यांचा भसम्या रोग लागलेले हे राजकारणी. आणखीन एक नग योगेश कदम ! होय, तोच झंडू बामफेम कदमांचा पुत्र. आईच्या नावे “सावली” हा डान्स बार चालवणारा, ज्याच्या बारमध्ये २२ बारबाला सापडल्या तोच महाराष्ट्राचा गृह राज्यमंत्री योगेश कदम. या नंतर बाप लेकाने केलेले अकाडतांडव म्हणजे निर्लज्ज पणाचा कळसच. बाया नाचवण्याचा धंदा पत्नी व आईच्या नावे करणारे हे बाप लेक राजकीय नीतिमत्तेस लागलेला कलंक आहेत. त्यांचा राजीनामा न मागणारे तर त्याहून मोठे कलंकित म्हटले पाहिजेत. ही यादी फार मोठी आहे. सत्तर हजार कोटींचा घोटाळा पचवणारे, महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील घोटाळेबाज, आज मंत्रिपद भूषवीत आहेत. ED च्या जाळ्यात अडकलेले प्रताप सरनाईक हे मंत्रिपदी आहेत.
महाराष्ट्राची अस्मिता दिल्लीतील दोन बापासमोर गहाण ठेवली जात आहे. मोदी- शाहच्या गुलामगिरीचे जोखड गळ्यात बांधून महाराष्ट्रात वावरणारे आज राज्यकर्ते आहेत, हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून जात असे. आज हिमालयाची चरणसेवा करण्यात कृत कृत होणारे लोटांगणवीर मराठी व महाराष्ट्रासाठी तोंड उघडू शकत नाहीत, या उलट शाहची मर्जी संपादन करण्यासाठी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यातील कार्यक्रमात “जय गुजरात!”चा नारा देणारे मराठी नेते कसल्या स्वाभिमान व आत्मसन्मानाच्या गमजा मारतात?
“महाराष्ट्र आत्ता थांबणार नाही” म्हणणाऱ्यांनी, महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या १०५ हुतात्म्यांची, हुतात्मा राजगुरू, स्वातंत्र्य वीर सावरकर, लोकमान्य टिळक, आगरकर यांच्या सारख्या स्वाभिमान्यांची मान शरमेनेखाली जाण्यासारखे कृत्य केलेली आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात “सहा काळी पाने” अशी या कालखंडाची नोंद होईल.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
९८२२९०२४७०