भारताच्या संरक्षण क्षेत्रात ऐतिहासिक झेप! स्वदेशी फिफ्थ जनरेशन लढाऊ विमान AMCA ची घोषणा
नवी दिल्ली/वर्षा चव्हाण
भारताच्या संरक्षण क्षमतेसाठी एक मैलाचा दगड ठरू शकेल अशी ऐतिहासिक घोषणा संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. भारत आता स्वतःचे पाचव्या पिढीचे (Fifth Generation) स्वदेशी लढाऊ विमान – उन्नत मध्यम लढाऊ विमान (AMCA) – विकसित करणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची जबाबदारी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) कडे देण्यात आली असून, याचे पहिले अधिकृत फोटोही नुकतेच सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रकल्पाला अधिकृत मंजुरी दिली असून, हा कार्यक्रम देशाच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक क्रांतिकारी पाऊल मानला जात आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत एअरोस्पेस उद्योगाला चालना देणे, स्वदेशी क्षमता निर्माण करणे आणि संरक्षण क्षेत्रात परकीय अवलंबित्व कमी करणे, हा या उपक्रमामागचा प्रमुख उद्देश आहे.
🟣AMCA प्रकल्पाची वैशिष्ट्ये
AMCA म्हणजे Advanced Medium Combat Aircraft – हे विमान पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे. यामध्ये पुढील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असेल:
1.स्टिल्थ टेक्नॉलॉजी (शत्रूच्या रडारवर आढळणार नाही)
2.सुपरक्रूज क्षमता (ध्वनीपेक्षा अधिक वेगाने सतत उड्डाणाची क्षमता)
3.उन्नत सेन्सर्स आणि शस्त्र प्रणाली
4.स्वदेशी इंजिन आणि संरचना
या विमानाच्या निर्मितीत देशातील नामवंत संशोधक, अभियंते आणि एअरोस्पेस क्षेत्रातील उद्योग सहभाग घेणार असून, एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (ADA) हा प्रकल्प पुढे नेईल.
🟠राष्ट्रीय सुरक्षेसाठी मैलाचा दगड
DRDO ने यापूर्वीही तेजस, आकाश, पिनाका, नाग इत्यादी स्वदेशी शस्त्र प्रणाली यशस्वीपणे विकसित केल्या आहेत. AMCA हे भारताच्या हवाई दलासाठी आधुनिक आणि आत्मनिर्भर पर्याय ठरणार असून, भविष्यातील युद्धनीतीत हे विमान महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
हा उपक्रम केवळ भारताच्या संरक्षण क्षमतेसाठी नव्हे, तर जागतिक स्तरावर भारताच्या एअरोस्पेस सामर्थ्याला ओळख मिळवून देण्याच्या दिशेने एक निर्णायक टप्पा ठरणार आहे.
भारतीय संरक्षण क्षेत्र आता आत्मनिर्भरतेच्या दिशेने ठाम पावले टाकत आहे! 🇮🇳✈️