आदिवासी विकास विभागाचा निधी वळवला; ‘लाडकी बहीण’ योजनेवरून वादंग
मुंबई/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी निधी मिळवण्यासाठी आता आदिवासी विकास विभागाच्या तरतुदींमध्येही हस्तक्षेप करण्यात आला आहे. तब्बल ₹335.70 कोटींचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्याचा शासन निर्णय शुक्रवारी काढण्यात आला. यामुळे सरकारच्या या योजनेवर टीकेची झोड उठली आहे.
या निधीतून मे महिन्याचा हप्ता ‘लाडकी बहिणीं’ना देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे याआधी सामाजिक न्याय विभागाच्या निधीतूनही असेच वर्गीकरण करण्यात आले होते. आता आदिवासी विकास विभागाच्या निधीला हात घातल्याने विरोधकांसह अनेक सामाजिक संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र अशा निधी वळतीच्या बातम्या खोट्या असल्याचे म्हणत परिस्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. तथापि, आदिवासी विकास विभागानेच जारी केलेला शासन निर्णय (जी.आर.) समोर आल्याने वादाला अधिक बळ मिळाले आहे.
सरकारकडून या योजनेसाठी दरमहा निधी वळवण्याची शक्यता व्यक्त होत असून, त्यामुळे आदिवासी भागातील विकासकामे व योजनांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
राज्य सरकार आता या वाढत्या टीकेला कसा प्रत्युत्तर देते आणि या परिस्थितीवर काय तोडगा काढते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.