करमाळा प्रतिनिधी :- गणेशोत्सव कालावधीत डी जे च्या आवाजाला लगाम लावणारे पोलीस प्रशासन इतर वेळी मात्र आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होत असतानाही डोळेझाक करताना पहायला मिळत आहे. करमाळा शहरात जयंती, पुण्यतिथी, विवाह सोहळे अथवा इतर कोणत्याही सणाकरिता पारंपारीक वादयाला फाटा देत डी जे लावण्याचा कल वाढलेला दिसत आहे. सध्या विवाह सोहळयाचे दिवस असून दररोज एखादा विवाह सोहळा पार पडतो व त्यामध्ये डी जे लावला जात आहे. विवाह सोहळयात डी जे लावतानाही पोलीस प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक करणे गरजेचे आहे.
कोणत्याही कार्यक्रमात डी जे लावताना त्याला आवाजाच्या डेसीबलची मर्यादा बंधनकारक आहे मात्र कोणत्याही प्रकारच्या नियमांचे पालन न करता कर्णकर्कश आवाज सोडला जात असल्याने शहरातील वयोवृध्द, हदयाची शस्त्रक्रिया झालेले रूग्ण, लहान मुले यांच्या जिवीताला धोका निर्माण होत आहे तसेच करमाळा शहरात अजूनही जुन्या इमारती असून त्या धोकादायक अवस्थेत पहायला मिळत आहेत त्या कधी या आवाजाने ढासळू शकतात हे सांगता येत नाही.
डीजेच्या मोठ्या आवाजामुळे आरोग्यावर घातक परिणाम होतात. हृदयावर ताण येणे, हार्ट अॅटॅक येणे किंवा स्ट्रोकसारखा जीवघेणा त्रास होऊ शकतो. रक्तदाब व हृदयाची धडधड वाढल्याने हार्मोनच्या पातळीत बदल झाल्याचा परिणाम अधिक घातकच ठरतो शरीरावर अनेक गंभीर परिणाम होतात. श्रवणशक्ती गमावणे, एकाग्रतेवर परिणाम, मानसिक समस्या निर्माण होणे यांसह माणूस चिडखोर आणि हिंसक होतो आहे. कायमचा बहिरेपणाही येऊ शकतो ज्येष्ठ नागरिक, गरोदर आणि नवजात शिशूंवर डीजेच्या कर्णकर्कश्श आवाजाचा सगळ्यात जास्त परिणाम होतो. या आवाजामुळे पोटातील बाळ दचकू शकते. त्यामुळे बाळाची हालचाल वाढते. आवाजामुळे तणाव वाढल्याने ही हालचाल सतत होत राहिली, तर आईची वेळेपूर्वीच प्रसूती होऊ शकते, अथवा गर्भपाताचाही धोका असतो, असे काही स्त्रीरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच मोठी जिवीत व वित्त हानी होवू शकते. काही दिवसांपूर्वीच करमाळा शहरातील एका इसमाचा डी जे च्या मिरवणूकीनंतर मृत्यू झालेला होता.
करमाळा शहरात पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्याची उत्तम कामगिरी आजपर्यंत केलेली आहे. प्रत्येक सार्वजनिक मिरवणूकीत पोलीस प्रशासन कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सतर्क असते. परंतु मिरवणूकी दरम्यान पोलीस प्रशासन उपस्थित असतानाही मोठा आवाज सोडला तरी पोलीस प्रशासन मात्र कोणतीच कारवाई करत नसल्याने आयोजकांना कायदयाचा धाक उरला नसल्याचे दिसत आहे. वास्तविक पाहता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदयाने गुन्हे दाखल करून त्यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. डी जे च्या आवाजाने मात्र करमाळा शहरातील नागरीक हैराण झाले आहेत व पोलीस प्रशासन डोळेझाक करीत आहे हे मात्र नक्की. या बातमीनंतर पोलीस प्रशासन डी जे मालकांवर कोणती कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे आहे.