मालवाहतूक पिकअप विक्रीसाठी आणणारे मध्य प्रदेशातील चोरटे अमळनेर पोलिसांच्या जाळ्यात
अमळनेर: विक्की जाधव
पोलीस ठाण्याच्या डीबी पथकास पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय माहिती प्राप्त झाली की एक चोरीची मालवाहतूक पिकअप गाडी अमळनेर शहरात विक्रीसाठी आणण्यात येत आहे. याबाबतची माहिती प्रभारी अधिकारी श्री. केदार बारबोले यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय निकम यांच्या आदेशानुसार गलवाडे रोडवरील माऊली टी हाऊसजवळ नाकाबंदी लावण्यात आली.
नाकाबंदी दरम्यान सायंकाळी अंदाजे 20.00 वाजता एक पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी (MH 18 G 3221) गलवाडे रोडकडून येताना दिसली. गाडी थांबवून तपासणी केली असता, तिच्यात दोन संशयित इसम आढळले. चौकशीत त्यांनी आपली नावे खालीलप्रमाणे सांगितली:
1. फिरोज खान अमित खान, वय 29 वर्षे, रा. आगार रोड, उज्जैन, मध्य प्रदेश
2. दानिश शेख अब्दुल शकूर शेख, वय 23 वर्षे, रा. साजापूर मोहल्ला, मोगलपुरा मस्जिद जवळ, ता. व जि. साजापूर, मध्य प्रदेश
वाहनाच्या मालकी व कागदपत्राबाबत विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यामुळे संशय वाढून गाडीची बारकाईने तपासणी केली असता, चिटकवलेल्या नंबर प्लेटखाली MP 43 G 2132 असा क्रमांक असलेली दुसरी प्लेट सापडली.
त्यानुसार मूळ वाहन मालकाशी संपर्क साधून विचारणा केली असता, सदर वाहन हे रतलाम, मध्य प्रदेश येथील असून दिनांक 12/04/2025 रोजी रात्री बस स्टँडच्या पाठीमागील भागातून चोरीस गेले असल्याचे सांगण्यात आले. याबाबत स्टेशन रोड पोलीस स्टेशन, रतलाम येथे गुन्हा क्रमांक 293/2025, भा.दं.वि. कलम 379 अंतर्गत दिनांक 14/04/2025 रोजी नोंदविण्यात आला आहे.
त्यानंतर अमळनेर पोलिसांनी रतलाम पोलिसांशी संपर्क साधून संबंधित कागदपत्रांसह कारवाईबाबत माहिती दिली. प्राथमिक चौकशीत दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांची ओळख साजापूर कारागृहात झाली असल्याचे निष्पन्न झाले.
दिनांक 17/04/2025 रोजी स्टेशन रोड पोलीस स्टेशन, रतलाम येथील अधिकाऱ्यांचे पथक अमळनेर येथे दाखल झाले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर वाहन व संशयित आरोपींचे रतलाम पोलिसांच्या ताब्यात हस्तांतर करण्यात आले. पुढील तपासात अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
कोणत्याही चोरीस गेलेल्या मालमत्तेबाबत किंवा संशयास्पद व्यक्तीबाबत नागरिकांनी माहिती दिल्यास ती गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन प्रभारी अधिकारी श्री. केदार बारबोले यांनी यावेळी केले आहे.