कर्मयोगी फाऊंडेशन बोलते नव्हे तर, कर्ते व्हा…
अनाथ दिव्याला मिळाली कर्मयोगीची सायकल…
कर्मयोगी फाऊंडेशनने विधवा महिलांच्या तसेच कोरोना काळात आई, वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलींचा शिक्षणातील उत्साह वाढविण्यासाठी १५१ सायकल वाटपाचा संकल्प केला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी गावोगावी जाऊन गरजवंत मुलींचे सर्वेक्षण सुरु आहे. हे कार्य चालू असताना कर्मयोगी सर्वेक्षण टीम हळदगावला पोहोचली. तेव्हा तेथे समजलं की या गावातील झोपडपट्टीत दिव्या दिनेश कुळमते ही अनाथ मुलगी राहते. दिव्यांच्या घरी गेल्यावर समजले की दिव्या आठव्या वर्गात आहे. लहान असतानाच तिची आई मरण पावली व वडील सोडून निघून गेले तर आजपर्यंत कुठे आहे याचा थांगपत्ताच नाही. दिव्याचे म्हातारे आजी आजोबा तीच पालनपोषण करतात. दिव्या सुद्धा आपल्या आजीसोबत शेतीच्या कामाला जाते. हातावर आणून पानावर खाणे अशी अतिशय हालाकीची परिस्थिती आहे. आजोबाला व्यवस्थित दिसत सुध्दा नाही. त्यामुळे ते घरीच असतात. दिव्या गावापासून ३ किलोमीटर दूर असलेल्या यशवंत हायस्कूल सेलडोह येथे पायदळ जाते. दिव्याची ही परिस्थिती जाणून तिची सायकल देण्यासाठी १९ फेब्रुवारीच्या पहिल्याच टप्प्यात निवड केली परंतु तीला कोणी सोबत आणायला नसल्यामुळे ती बुटीबोरी येथे येऊ शकली नाही. त्यानंतर सायकल वाटपाचे पाच टप्पे झाले. प्रत्येक टप्प्यात दिव्याची फेरनिवड करण्यात आली, पण दिव्या सायकल घ्यायला येऊ शकली नाही. १२५ सायकलचे वाटप झाले परंतु अनाथ दिव्याला सायकल मिळाली नाही यांची कर्मयोगीला खंत होती.,
अखेर आज दिनांक ५/६/२२ रोज रविवारला आसोला सावंगी येथील अर्पणा ताई आडकीने याना सोबत घेऊन हळदगाव येथे दिव्याच्या घरी सायकल घेऊन पोहोचलो. दिव्या आपल्या आजीसोबत लग्नाला गेली होती. तिचे आजोबा व मोठी आई घरी मिळाली. आजोबांना सांगितले इकडे या दिव्यासाठी सायकल आणली तुमच्या सोबत एक फोटो काढायचा आहे. ते लगबगीने समोर आले. त्यांना जवळपास दिसतच नोव्हत परंतु सारखे सायकलकडे निरखून पहात होते, त्यांना जणू वाटत होतं की आमच्या गरीबांची कोणी चेष्टा तर करत नाहीना. बऱ्याच वेळानंतर म्हणाले माझ्या दिव्यासाठी आजपर्यंत कोणीच काही आणले नाही. तुम्ही सायकल आणली आम्ही तुम्हाला जन्मभर विसरणार नाही हे बोलताना त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वहात होते. दिव्याचा घराच्या बाहेर बसलेल्या महिला मंडळी म्हणत होत्या तुम्ही दिव्याला सायकल देऊन खुप पुण्याचं काम केलं. खूपच परिस्थिती गरीब आहे दादा दिव्याची. हे ऐकून मनाला समाधान वाटलं की चला कर्मयोगी गोरगरीब दिनदुबल्याना प्रेमरूपी आधार देण्यात यशस्वी ठरत आहे.