स्व. अजित दादा पवार यांच्या स्मृतींना शब्दांतील अभिवादन; ‘दादा : माझ्या मनातील प्रेरणा’ उपक्रमाचा शुभारंभ
स्व. अजित दादा पवार जयंतीनिमित्त अनोखी आदरांजली;’दादा : माझ्या मनातील प्रेरणा’ उपक्रमातून २,५०० कर्मचाऱ्यांच्या भावना शब्दबद्ध.
बारामती, प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
बारामती हाय-टेक टेक्सटाइल पार्क लिमिटेड येथे स्व. अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमासह “दादा : माझ्या मनातील प्रेरणा” – स्व. अजित दादा पवार जयंती विशेष लेखन – २०२६ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारामती हाय-टेक टेक्सटाइल पार्कचे संचालक तथा पेपरमिंट कंपनीचे मालक आणि द क्लोदिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया (CMAI) चे अध्यक्ष मा. श्री. संतोष कटारिया उपस्थित होते. त्यांनी स्व. अजित दादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी बोलताना श्री. कटारिया यांनी स्व. अजित दादा पवार यांनी समाजहित, उद्योग, रोजगारनिर्मिती, महिला सक्षमीकरण आणि विकासासाठी दिलेले योगदान प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येकाने आपल्या जबाबदाऱ्या अधिक प्रामाणिकपणे पार पाडाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. तसेच टेक्सटाइल पार्कमधील सर्व कर्मचाऱ्यांनी “दादा : माझ्या मनातील प्रेरणा” या विशेष लेखन उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपल्या भावना, आठवणी आणि प्रेरणादायी अनुभव लेखनातून व्यक्त करावेत, असेही त्यांनी नमूद केले.
या उपक्रमात टेक्सटाइल पार्कमधील सुमारे २,५०० कर्मचारी सहभागी होणार असून, “स्व. अजित दादा पवार : माझ्या आयुष्यातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व”, “दादांनी दिलेली शिकवण आणि माझ्या जीवनातील बदल” तसेच “दादांचे स्वप्न – माझी जबाबदारी” या विषयांवर मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत लेखन करण्यात येणार आहे. निवडक लेखांचे संपादन करून “दादा : माझ्या मनातील प्रेरणा” या नावाने स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे. प्रत्येक सहभागी आपल्या लेखाच्या शेवटी “दादांसाठी माझा एक संकल्प” हे प्रेरणादायी वाक्य लिहिणार असून, त्यासोबत संबंधित कर्मचाऱ्याचा फोटो, नाव, कंपनी आणि संकल्पाचाही समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ लेखन स्पर्धा न राहता, २,५०० कर्मचाऱ्यांच्या भावना, विचार आणि स्व. दादांप्रती असलेल्या आदराचा ऐतिहासिक वैचारिक दस्तऐवज ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
याच निमित्ताने बारामती हाय-टेक टेक्सटाइल पार्क कार्यालय तसेच बारामती सहकारी बँक, टेक्सटाइल पार्क शाखेत स्व. अजित दादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. खंडू गायकवाड यांनी केले, तर आभार श्री. विजय कोकाटे यांनी मानले.
यावेळी श्री. जयदीप तुपे, श्री. नाचेकेत वैद्य, श्री. सुनील पाटील, श्री. अनिल अडवाणी, श्री. कल्पेश, श्री. प्रवीण गदादे, श्री. स्वामी, श्री. संतोष नलावडे, श्री. मनोज कुलकर्णी, सौ. सोनाली मुनोत तसेच बारामती हाय-टेक टेक्सटाइल पार्कमधील अधिकारी, कर्मचारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.