‘शिक्षण वाचवा, लोकशाही वाचवा’चा बुलंद नारा; अमळनेरात सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले नागरिक
अमळनेर : विक्की जाधव
दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देत अमळनेर शहरात महाविकास आघाडीसह विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी एकजूट दाखवत भव्य मोर्चा काढला. तरुण, विद्यार्थी आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आंदोलनाचे जनआंदोलनात रूपांतर झाले. हातात फलक, घोषणांनी दुमदुमलेले रस्ते आणि सरकारविरोधात व्यक्त झालेला संताप यामुळे संपूर्ण शहराचे लक्ष या मोर्चाकडे वेधले गेले. देशभरात सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला विविध शहरांतून पाठिंबा व्यक्त केला जात आहे. मोर्चादरम्यान शिक्षण व्यवस्था, विद्यार्थ्यांचे प्रश्न, पेपरफुटी प्रकरण आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणाचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला. “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा”, “लोकशाहीचा आवाज दाबू नका” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन देत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तातडीने ठोस निर्णय घेण्याची मागणी केली.