राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ जळगावात काँग्रेस आक्रमक; पंतप्रधान मोदी यांच्या पुतळ्याचे दहन
जळगाव : दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलिस कारवाईचा निषेध करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धरणे आंदोलन केले. त्यावेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीने बुधवारी जोरदार आंदोलन छेडले. या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले तसेच केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष वागणुकीचा निषेध नोंदवत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलनावेळी “लोकशाही वाचवा”, “विद्यार्थ्यांवरील अन्याय बंद करा” तसेच मोदी-शहा सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या आंदोलनात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव, उपाध्यक्ष सुभाष पवार, माजी शहर जिल्हाध्यक्ष श्याम तायडे, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष ॲड. कौस्तुभ पाटील, ज्येष्ठ नेते श्रीधर चौधरी, विजय वाणी, युवक अध्यक्ष मुजीब पटेल, जिल्हा सरचिटणीस बाबा देशमुख, सचिव दीपक सोनवणे, सचिव जाकिर बागवान, जळगाव तालुका अध्यक्ष मनोज चौधरी, रफिक शेख, दिनेश पाटील, दीपक पाटील, प्रवीण पाटील, भुवन्यू सूर्यवंशी यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टीप: या बातमीत नमूद केलेली माहिती काँग्रेस पक्षाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनावर आधारित आहे.