कर्तव्याची किंमत जीवाने चुकवली! शरद गोसावी यांच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांचे आंदोलन..
अमळनेर : विक्की जाधव.
शहरातील भगवा चौक परिसरात वीजपुरवठ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना महावितरणचे कर्तव्यदक्ष वायरमन शरद गोसावी यांचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. कर्तव्य बजावताना घडलेल्या या दुर्घटनेने संपूर्ण अमळनेर तालुका हादरला असून महावितरण कर्मचाऱ्यांसह नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. ही घटना नेमकी कशी घडली, याबाबत अधिकृत चौकशी सुरू असून निष्काळजीपणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

घटनेनंतर सहकाऱ्यांनी आणि नागरिकांनी शरद गोसावी यांना तातडीने नर्मदा मेडिकल फाउंडेशन येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय, नातेवाईक आणि सहकाऱ्यांनी मोठी गर्दी केली. आपल्या कर्तव्यावर असताना एका कर्मचाऱ्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, संतप्त नातेवाईकांनी शरद गोसावी यांचा मृतदेह घेऊन अमळनेर प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. या दुर्घटनेमागे संबंधित अधिकाऱ्यांचा किंवा यंत्रणेचा निष्काळजीपणा असल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. जोपर्यंत जबाबदारांवर ठोस कारवाईचे आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन होऊ देणार नसल्याची ठाम भूमिका कुटुंबीयांनी घेतली होती.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती तात्काळ लाईन चेकिंग अधिकाऱ्यांना दिली असून त्यांचा अहवाल पोलीस प्रशासन आणि प्रांत अधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे. प्रांत अधिकाऱ्यांनीही या प्रकरणात कोणताही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट करत, “शेवटी एका व्यक्तीचा जीव गेला आहे” असे सांगितले. पोलीसही तांत्रिक तपास करत असून पोस्टमार्टम अहवाल आणि लाईन चेकिंग अधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यक त्या कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, या दुर्घटनेचे नेमके कारण अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार असले तरी, संपूर्ण प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी नागरिक, महावितरण कर्मचारी आणि विविध संघटनांकडून केली जात आहे. आता या प्रकरणात पुढे नेमकी कोणती कारवाई होते, याकडे संपूर्ण अमळनेरचे लक्ष लागले आहे.
वायरमन शरद गोसावी यांचे शेवटचे वॉट्सअप स्टेटस ठरतंय चर्चेचा विषय.
दिवसभर तारा जोडत फिरतो, पण नशिबाचे तुटलेले धागे कोण जोडतो?
इतरांच्या घरात उजेड पसरवतो, पण स्वतःच्या आयुष्यात मात्र अंधारच सहन करतो.
पाऊस असो, ऊन असो किंवा वादळ,कामासाठी नेहमीच तयार असतो खंबीर.
जीव धोक्यात घालून प्रत्येक जोडणी करतो,तरीही त्याच्या कष्टांची किंमत कमीच ठरते.
हातांवरच्या जखमा त्याची ओळख बनतात,घामाचे थेंबच त्याची खरी कमाई असतात.
स्वप्नं मोठी असतात, पण वेळ कमी पडतो,कुटुंबासाठी मात्र तो प्रत्येक संकटाशी लढतो.
तो फक्त वायर जोडत नाही, तर अनेकांच्या आयुष्यात प्रकाश पेटवतो.
प्रत्येक इलेक्ट्रिशियनला सलाम, कारण तो स्वतः जळून इतरांच्या आयुष्यात उजेड निर्माण करतो.
