अन्यायकारक करांविरोधात ग्राहक पंचायतचा ठाम आवाज.
अमळनेर : विक्की जाधव.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे लोक वर्गणी, पाणीपट्टीवरील व्याज तसेच प्रॉपर्टी खरेदीदारांवर लावण्यात येणारा दोन टक्के कर रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी अमळनेर नगरपरिषदेचे नूतन अध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांना निवेदन देण्यात आले. दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी ग्राहक पंचायतच्या वतीने प्रथम त्यांचे अभिनंदन करण्यात आले व त्यानंतर नागरिकांवर गेल्या अनेक वर्षांपासून बळजबरीने लादल्या जात असलेल्या करांविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

निवेदनात नमूद करण्यात आले की, लोक वर्गणीच्या नावाखाली होत असलेली कर वसुली अन्यायकारक असून त्यामागे कोणतेही ठोस कारण नगरपरिषदेकडे नाही. तसेच आर्थिक वर्षाचा शेवट ३१ मार्च असताना ३१ डिसेंबरपासूनच पाणीपट्टीवर दोन टक्के व्याज आकारणे ही नागरिकांची सरळ पिळवणूक आहे. याशिवाय प्रॉपर्टी खरेदीवेळी आधीच स्टॅम्प ड्युटी व इतर कर भरावे लागत असताना, फक्त नाव बदलासाठी नगरपालिकेकडून दोन टक्के कर आकारला जाणे हेही अन्याय्य असल्याचा सूर ग्राहक पंचायतने लावला.
यापूर्वी १७ डिसेंबर २०२४ रोजी दिलेल्या निवेदनावर “लोक वर्गणी व त्यावरील व्याज आकारणी थांबवू” असे आश्वासन देण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही न झाल्याने पुन्हा हे निवेदन देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावेळी स्वीकृत नगरसेवक प्रताप अण्णा साळी व नगरसेवक प्रा. रामकृष्ण पाटील यांचेही अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमास ग्राहक पंचायतच्या अध्यक्ष ॲड. स्मिता चंदात्रे यांच्यासह सौ. भारती अग्रवाल, सौ. कपिला मुठे, सौ. वनश्री अमृतकर, सौ. ज्योती भावसार, मकसूद बोहरी, विजय शुक्ल, सुनील वाघ, सतीश देशमुख, जयंतीलाल वानखेडे व सौ. रजनी पाटील आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.