२०१-बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीची शक्यता; मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

अपनी भाषा में पढ़े! Translate

२०१-बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीची शक्यता; मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

बारामती/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

पुणे जिल्ह्यातील २०१-बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाल्याने ती भरण्यासाठी लवकरच विधानसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या वतीने सदर विधानसभा मतदारसंघाकरिता दिनांक ०१ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयादींचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

भारत निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मधील कलम २१ अन्वये हा कार्यक्रम घोषित केला असून, त्यासंदर्भात सविस्तर सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाचा उद्देश मतदारयादी अद्ययावत, अचूक व पारदर्शक ठेवणे हा असून, आगामी पोटनिवडणूक प्रक्रियेच्या दृष्टीने ही महत्त्वाची पायरी मानली जात आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, एकत्रीकृत प्रारूप मतदारयादी दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ (सोमवार) रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर ९ फेब्रुवारी २०२६ ते २५ फेब्रुवारी २०२६ (बुधवार) या कालावधीत मतदारांना दावे व हरकती सादर करता येणार आहेत. प्राप्त झालेल्या दावे व हरकतींची छाननी करून त्या ६ मार्च २०२६ (शुक्रवार) पर्यंत निकाली काढण्यात येणार आहेत. त्यानंतर १० मार्च २०२६ (मंगळवार) रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येईल.

या प्रक्रियेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने, मान्यता प्राप्त राजकीय पक्षांना सविस्तर माहिती देण्यासाठी तसेच मतदान केंद्रांची यादी तयार करताना स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे तसेच मतदार नोंदणी अधिकारी, बारामती यांच्या स्तरावर राजकीय पक्षांबरोबर बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे.

दरम्यान, १८ वर्षे पूर्ण झालेल्या पात्र नागरिकांनी या कालावधीत आपले नाव मतदारयादीत समाविष्ट आहे की नाही याची खातरजमा करावी, तसेच नाव नोंदणी, दुरुस्ती किंवा वगळणीसंदर्भात आवश्यक ते दावे व हरकती वेळेत सादर कराव्यात, असे आवाहन निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!