“न. पा. कार्यालयाच्या मागे कचऱ्याचे साम्राज्य! अमळनेर नगरपालिकेच्या दारातच स्वच्छतेची कबर”
अमळनेर : विक्की जाधव.
नगरपालिकेच्या मागील बाजूस उभारण्यात आलेल्या नगरपालिका शॉपिंग संकुलाच्या पाठीमागील कोपऱ्यात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचा ढीग साचल्याचे विदारक चित्र सध्या पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेला हा कचरा परिसरात तीव्र दुर्गंधी पसरवत असून, स्वच्छ शहर सुंदर शहर या संकल्पनेलाच हरताळ फासत आहे.

या साचलेल्या कचऱ्यामुळे डास, माशा व किड्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता असून, त्याचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, याच परिसरात व्यापारी संकुल असल्याने दुकानदार, ग्राहक तसेच पादचाऱ्यांना नाक दाबून वावरावे लागत आहे. नगरपालिकेच्या कार्यालयाच्या अगदी शेजारीच अशी अवस्था असणे हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.दरम्यान, या कचऱ्याची तात्काळ विल्हेवाट लावून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा प्रशासनाविरोधात नागरिकांचा रोष उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. “जी जबाबदारी आहे, ती वेळेत पार पाडावी” अशी ठाम अपेक्षा आज अमळनेरकर व्यक्त करत असून, आता नगरपालिकेने जागे होणे गरजेचे आहे.