करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- करमाळा येथील किल्ला वेस येथून महात्मा गांधी विद्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आज पहाटे एक मालवाहू ट्रक अडकल्याने किल्ला विभागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. अरुंद रस्ता आणि त्यात उभ्या असलेल्या या अजस्त्र ट्रकमुळे शाळेत जाणारे विद्यार्थी, आणि स्थानिक नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे
अत्यंत वर्दळीचा आणि अरुंद असलेल्या या मार्गावर मालवाहू ट्रकची ये-जा कशी होते, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. शहरात अनेक ठिकाणी अशाच प्रकारे छोट्या रस्त्यांवर अवजड वाहने उभी राहत असल्याने ‘ट्रॅफिक जाम’ची समस्या नित्याची झाली आहे. एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा रुग्णाला रुग्णालयात न्यायचे असल्यास, या वाहतूक कोंडीमुळे मौल्यवान वेळ वाया जात असून यामध्ये एखाद्या रुग्णाचा मृत्यू होवू शकतो.
आजच्या घटनेत ट्रक अडकल्यामुळे मागाहून येणाऱ्या चारचाकी वाहनांना रिव्हर्स घेणेही कठीण झाले होते. त्यातच दुसरीकडे, ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांची मुजोरी वाढली आहे. कोर्टाच्या बाजूने स्वतंत्र बाह्य रस्ता उपलब्ध असतानाही अनेक ट्रॅक्टर चालक महात्मा गांधी विद्यालयासमोरून बेधडकपणे वाहने चालवत आहेत. यामुळे शाळेत जाणाऱ्या लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण असून अपघाताची टांगती तलवार कायम आहे.
बेकायदेशीरपणे शहरात शिरणाऱ्या अवजड वाहनांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. अरुंद रस्त्यांवर मालवाहू ट्रकना प्रवेशबंदी घालावी आणि ट्रॅक्टर चालकांना बाह्य रस्त्याचा वापर करण्यास भाग पाडावे व शहरात मोठी वाहने येऊ नयेत म्हणून कायमस्वरूपी उपाय योजना करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.