पुणे ग्रामीण जिल्ह्यात १९ फेब्रुवारीपर्यंत कडक प्रतिबंधात्मक आदेश
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
पुणे/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
पुणे ग्रामीण जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. याअंतर्गत अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ अन्वये संपूर्ण पुणे ग्रामीण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. हे आदेश ६ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री १२.०५ वाजल्यापासून सुरू होऊन १९ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अंमलात राहणार आहेत.
या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी दाहक पदार्थ, स्फोटक द्रव्ये, दगड, तसेच कोणत्याही प्रकारची शस्त्रे किंवा हत्यारे बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. यामध्ये सोटे, भाले, तलवारी, काठ्या, बंदुका तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू यांचा समावेश आहे. तसेच कोणत्याही व्यक्तीचे प्रतिकात्मक प्रेत, राजकीय किंवा सामाजिक पुढाऱ्यांची छायाचित्रे किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन किंवा दहन करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
प्रशासनाने मोठ्याने अर्वाच्च किंवा चिथावणीखोर घोषणा देणे, सार्वजनिक शांतता भंग होईल अशा प्रकारे वाद्य वाजविणे यावरही निर्बंध घातले आहेत. सभ्यता, नीतिमत्ता तसेच सामाजिक सलोखा धोक्यात येईल, राज्याच्या सुरक्षिततेला बाधा निर्माण होईल किंवा कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहोचेल अशा प्रकारची आवेशपूर्ण भाषणे, हावभाव किंवा प्रचारात्मक कृती करण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली आहे.
याशिवाय महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अंतर्गत पाचपेक्षा जास्त व्यक्तींचा जमाव करण्यास बंदी असून, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतीही सभा, आंदोलन किंवा मिरवणूक काढण्यास अनुमती दिली जाणार नाही. कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल अशा कोणत्याही प्रकारच्या कृतीवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मात्र शासनाच्या सेवेत कार्यरत अधिकारी व कर्मचारी तसेच आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य बजावताना शस्त्रे बाळगणे आवश्यक असलेल्या आणि त्यासाठी अधिकृत परवानगी असलेल्या व्यक्तींना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तींवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यास हातभार लावावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.