छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गराज्याला ‘युनेस्को’चा जागतिक सन्मान!
मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या अभेद्य दुर्गराज्याचा गौरव आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गूंजू लागला आहे. महाराष्ट्रातील ११ किल्ले आणि तामिळनाडूतील १ किल्ला, असे एकूण १२ किल्ले यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ (World Heritage Site) म्हणून मान्यता मिळाली आहे.
हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी केवळ अभिमानाचा नाही, तर इतिहासाला उजाळा देणारा आणि भविष्यासाठी प्रेरणा देणारा ऐतिहासिक क्षण ठरला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि वास्तुशिल्प परंपरेला मिळालेला हा जागतिक दर्जाचा सन्मान, छत्रपतींच्या स्वराज्य स्थापनेच्या दूरदृष्टीची आणि किल्ल्यांमधील रणनीतीपूर्ण दृष्टिकोनाची साक्ष देतो.
यामध्ये राजगड, तोरणा, रायगड, सिंधुदुर्ग, प्रतापगड, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, लोहमगड, सिंहगड, भुईकोट किल्ले अशा काही प्रमुख किल्ल्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. हे किल्ले केवळ लढायांचे साक्षीदार नसून, स्वराज्याच्या स्थापनेचे आणि लोकसामर्थ्याचे प्रतीक आहेत. राज्य सरकार, पुरातत्व विभाग आणि इतिहासप्रेमी संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही मान्यता मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे या किल्ल्यांचे संवर्धन, संरक्षण आणि पर्यटनवृद्धीस चालना मिळणार आहे. शिवरायांचा वारसा आता जगाच्या नकाशावर ठसठशीतपणे उमटला आहे!