राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त बारामतीत विविध उपक्रमांचे आयोजन
बारामती/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
२४ डिसेंबर रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय ग्राहक पंचायत, बारामती तालुका यांच्या वतीने ग्राहक जनजागृतीसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावर्षीची थीम “Efficient and Speedy Disposal Through Digital Justice” अशी असून “जागो ग्राहक जागो” व “ग्राहक एवं राजा” या संदेशांतून ग्राहक हक्कांबाबत जनजागृती करण्यात आली.
हा कार्यक्रम स्वप्रा एज्युटेक व अखिल भारतीय ग्राहक पंचायत, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मुक्ताई ब्लड सेंटर, इंदापूर यांच्या सहकार्याने रविवार, दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी अधिराज लॉन्स, बारामती येथे सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत पार पडला.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, पुणे जिल्हाध्यक्ष ॲड. तुषार झेंडे पाटील यांनी सायबर क्राईम व ग्राहक संरक्षण कायदा २०१९ या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. डिजिटल युगात ग्राहकांनी घ्यावयाची काळजी, ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी उपाययोजना तसेच कायदेशीर हक्क व संरक्षण याबाबत त्यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत स्वप्रा एज्युटेक आयोजित जिल्हास्तरीय अबॅकस स्पर्धा – बारामती २०२४ चा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या वतीने रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या सर्व उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्वी गलांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शितल जांभूळकर यांनी केले.
या कार्यक्रमास सौ. शोभा मोरे, श्री. संदीप पानसरे, श्री. प्रथमेश धापटे, श्री. सोमनाथ कावडे, ॲड. सौ. अनिता गावडे यांच्यासह अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे पुणे जिल्हा अध्यक्ष ॲड. श्री.तुषार झेंडे पाटील,तालुकाध्यक्ष श्री. संजीव बोराटे, महिला अध्यक्ष सौ. मंजुश्री तावरे, उपाध्यक्ष श्री. सतीश खंडाळे, श्री. प्रशांत जगताप, सचिव श्री. महेश पवार, सहसचिव श्री. युवराज इंदलकर, सहकोषाध्यक्ष श्री. सचिन चौधर, प्रसिद्धी प्रमुख सौ. वर्षा चव्हाण, संयोजक सदस्य श्री. बाबासाहेब शिंदे ,श्री. प्रमोद मोरे, तसेच इंदापूर तालुका पदाधिकारी नाजिया सय्यद, सौ. अर्चना गोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे ग्राहक हक्कांबाबत जनजागृती वाढण्यास निश्चितच मदत झाली, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.