सुपे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांना सर्वोत्कृष्ट “दोषसिद्धी ” पुरस्कार प्रदान.
निरा नरसिंहपुर :दिनांक- 18 , प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
बारामती तालुक्यातील सुपे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांना पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे सर्वोत्कृष्ट “दोषसिद्धी” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . पुणे येथील पोलीस अधीक्षक कार्यालय येथे नुकताच हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते नागनाथ पाटील यांना हा पुरस्कार देण्यात आला. पाटील यांनी इंदापूर येथे कार्यरत असताना येथील पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा उत्कृष्टरित्या तपास केल्याने आरोपीचा दोष सिद्ध झाला, त्यामुळे पाटील यांना हा पुरस्कार देण्यात आला. तर भविष्यात ही अशीच कामगिरी कराल अशा शुभेच्छा अंकित गोयल यांनी दिल्या.
इंदापूर मध्ये कार्यरत असताना एक शिस्तप्रिय, जबाबदार, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नागनाथ पाटील यांची ओळख आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल , सहाय्यक पोलीस अधीक्षक आनंद भोईटे (बारामती विभाग), सहाय्यक पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांसह जिल्ह्यातील सर्व पोलीस उपविभागीय अधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.