अमळनेरात डेंगू-हिवताप प्रतिबंधासाठी विशेष मोहीम; १४ पथकांमार्फत साचलेल्या पाणीसाठ्यांवर उपाययोजना
अमळनेर : विक्की जाधव.
शहरात डेंगू व हिवतापाच्या संभाव्य प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी शुक्रवार, दि. १० जुलै रोजी विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यात आली. लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परिक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, सर्व नगरसेवक-नगरसेविका तसेच मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागांमध्ये साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी गप्पी मासे सोडणे, ऑबेट, ऑईल बॉल व ऑईल टाकण्याची प्रभावी उपाययोजना करण्यात आली.
ही मोहीम तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, नगरपरिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन, वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. आर. शेलकर, आरोग्य पर्यवेक्षक प्रशांत फुगे तसेच आरोग्य निरीक्षक किशोर माळी व अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. मोहिमेत १४ पथके, ४३ आशा स्वयंसेविका, सर्व आरोग्य सेवक व आरोग्य सेविका यांनी सक्रिय सहभाग घेत शहरातील विविध भागांत प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे पार पाडल्या.
सदर मोहीम ही मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या आदेशानुसार राबविण्यात आली. नागरिकांनी घराच्या परिसरात पाणी साचू न देणे, स्वच्छता राखणे आणि आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. डेंगू व हिवतापमुक्त अमळनेर घडविण्यासाठी प्रशासनाकडून अशा प्रतिबंधात्मक मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.