मोर्चेमुक्त अन कर्जमुक्त अमळनेरचे आश्वासन! विकासाला देणार गती. शिंदे गटाचा वचननामा ठरला चर्चेचा विषय.
अमळनेर : शहरातील नागरिकांवर वर्षानुवर्षे टाकला गेलेला लोकवर्गणीचा बोजा पूर्णपणे रद्द करणार, अवाजवी करवाढ आटोक्यात आणणार आणि मोर्चेमुक्त अमळनेर घडवणार अशा घोषणांसह शिवसेना (शिंदे गट) तर्फे माजी आमदार शिरीष चौधरी व नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी पत्रकार परिषद घेऊन वचननामा प्रसिद्ध केला. शहरातील दैनंदिन समस्यांवर थेट बोट ठेवत, विकासाची नवी दिशा देण्याचा संकल्प या वचननाम्यात मांडण्यात आला.
यावेळी बोलतांना माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आमदार अनिल पाटील यांच्यावर थेट आरोपांची सरबत्ती केली.
“वाळू, सट्टा, दारू बंद करणार” असे मोठमोठे दावे करणारे अनिल पाटील सत्तेत गेल्यावर सर्वच अवैध धंदे फोफावू लागले. त्यांचेच कार्यकर्ते हे धंदे करतात आणि ते स्वतः वाळू माफियात गणले जातात, असा आरोप करत चौधरी म्हणाले, “आमची सत्ता आणली तर समस्या मुळातून दूर करू; त्यामुळे मोर्चे निघणारच नाहीत. त्यांना माहित आहे की ते काम करणार नाहीत, म्हणूनच मोर्च्यांची भीती.” दरम्यान, कोटींच्या कर्जात बुडालेल्या नगरपरिषदेची मुक्तता करण्यापासून ते नवी नगरपालिका इमारत, शहर प्रवेशद्वार, बोरी नदीवरील बंधारे, रेल्वे उड्डाणपूल, शिवराय आंबेडकर पुतळ्यांचे काम, भुयारी गटार योजना, संत सखाराम महाराज भक्तनिवास, पोलीस वसाहत, मंगळग्रह देव मंदिर विकास, कलाली पाणी योजना आदी पूर्ण झालेल्या कामांचा लेखा-जोखा त्यांनी मांडला. “आम्ही दिलेला उमेदवार अमळनेरचा आणि काम करणारा आहे. मतदानासाठी बाहेरचा म्हणुन चालणार नाही तर? विरोधकांकडे कामावर बोलण्यासाठी मुद्देच नाहीत हा बाहेरचा तो नंदुरबारचा यामध्येच अंमळनेरच्या जनतेचा वेळ घालून आपली राजकीय पोळी भाजण्यात विरोधक व्यस्त आहेत अशा शब्दांत त्यांनी आरोपांना उत्तर दिले.
