इंदापूर ला अजितदादा सभा घेत आहेत म्हंटल्यावर विषय चर्चेचा झालाय..
पक्षाला कोले करून गेलेले प्रदीप गारटकर यांच्याबद्दल काय बोलणार याकडे तालुक्याचे लक्ष
(निलेश गायकवाड)
इंदापूर : इंदापूर नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या प्रचाराला अंतिम टप्प्यात निवडणुकीला अति वेग आला असून शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्रचार रॅलीकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी भरतशेठ शहा आणि नगरसेवक पदांसाठी उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांची ही रॅली व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
रॅली रविवार, ३० नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २.०० वाजता श्रीराम चौक, इंदापूर येथून सुरू होणार असून जामदार गल्ली, नेहरू चौक, आंबेडकर चौक, खडकपुरा, व्यंकटेश नगर मार्गे बाबा चौकात समारोप होणार आहे. दरम्यान, कृष्णा भिमा विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रदीप गारटकर यांनी अलीकडेच पक्षाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या सभेत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. आपल्या भाषणात त्यांनी उमेदवारी निवडीबाबत नाराजी व्यक्त केल्याचे समजते. तसेच, “जर पक्षाने आम्हाला कोलले तर आम्हीही पक्षाला कोलू,” असे वक्तव्यही त्यांनी केले होते. याशिवाय पक्षाचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या संदर्भातील त्यांच्या विधानांनाही चर्चेचा विषय मिळाला आहे.
या पार्श्वभूमीवर आजची सभेत अजित पवार कोणती भूमिका स्पष्ट करणार याकडे राजकीय वर्तुळासह इंदापूरकरांचे लक्ष लागले आहे. निवडणूक समीकरणांवर सभेतील विधानांचा प्रभाव पडू शकतो, अशी चर्चा आहे.
आयोजकांनी सर्व नागरिकांना शांततेत आणि शिस्तबद्धतेने कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.