नगरपरिषद व नगरपंचायती निवडणूक : १ डिसेंबरपर्यंतच प्रचार; २ डिसेंबरला मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
पुणे/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. यानिमित्ताने प्रचाराची मुदत १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजेपर्यंतच ठेवण्यात आली आहे. त्यानंतर कोणत्याही प्रकारचे प्रचारकार्य, सभा, मोर्चे तसेच ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात, प्रसिद्धी व प्रसारणदेखील तत्काळ बंद ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी २ डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी घोषणा करण्यात आली आहे. या दिवशी पात्र मतदारांनी निश्चितपणे मतदानाचा हक्क बजावावा, असेही आवाहन श्री. डुडी यांनी केले.
जिल्ह्यातील आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी–उरळी देवाची, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, लोणावळा, माळेगाव बुद्रुक, मंचर, राजगुरुनगर, सासवड, शिरूर, तळेगाव दाभाडे व वडगाव या नगरपरिषद व नगरपंचायतींच्या मतदारसंघांमध्ये सुट्टी लागू राहील.
तसेच संबंधित मतदारसंघाच्या क्षेत्राबाहेर कामानिमित्त असलेल्या पात्र मतदारांना सुट्टीचा लाभ मिळणार आहे. केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींनाही ही सुट्टी लागू राहणार आहे.
२ डिसेंबर रोजी सर्व पात्र मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले आहे.