मोबाईल UPI व्यवहारात मोठे बदल – 1 ऑगस्टपासून नवीन नियम लागू
मार्मिक न्यूज नेटवर्क :
देशभरात 1 ऑगस्टपासून UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) व्यवहारांमध्ये अनेक महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) हे बदल जाहीर केले असून, डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित, नियंत्रीत आणि सर्व्हर लोड कमी करण्याच्या उद्देशाने हे पावले उचलण्यात आली आहेत.
नवीन नियमानुसार ग्राहक आता दिवसातून केवळ ५० वेळा बँक बॅलन्स तपासू शकतील, तर बँक खात्यांची यादी पाहण्यावर २५ वेळांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. UPI व्यवहार फेल झाल्यास स्थिती तपासण्यासाठी फक्त ३ प्रयत्नांचीच परवानगी देण्यात आली असून, प्रत्येक प्रयत्नात ९० सेकंदांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. EMI व OTT सबस्क्रिप्शनसाठीचे ऑटोपे व्यवहार ठराविक वेळेत – सकाळी १० नंतर व दुपारी १ ते ५ या वेळेतच – प्रोसेस केले जातील. यामुळे इतर वेळेत व्यवहार अडकण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान, व्यवहार करताना आता रिसिव्हरचं नाव स्पष्टपणे दिसणार आहे, जे फसवणूक टाळण्यासाठी उपयुक्त ठरेल. २००० रुपयांपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार सामान्य ग्राहकांसाठी यापुढेही मोफत राहतील. मात्र, व्यापाऱ्यांना काही व्यवहारांवर GST लागू होण्याची शक्यता आहे.

या नव्या नियमांमुळे ग्राहकांनी त्यांच्या व्यवहाराच्या सवयींमध्ये बदल करणे आवश्यक आहे. NPCI च्या या पावलामुळे डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित व शिस्तबद्ध होणार आहेत.