अमळनेर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात संपन्
अमळनेर : विक्की जाधव.
४ ऑगस्ट २०२५ : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार, गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण अंतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथे मोठ्या उत्साहात पार पडले.

या शिबिराचे उद्घाटन तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी मा. श्री. रुपेशकुमार सुराणा यांच्या हस्ते शनि मंदिर, मंगरुळ येथे करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी नरेंद्र पाटील, महिला व बालकल्याण अधिकारी प्रेमलता पाटील, निवडणूक नायब तहसिलदार प्रशांत धमके, संजय गांधी योजना नायब तहसिलदार राजेंद्र ढोले तसेच तालुका स्तरावरील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिबिरात नगाव मंडळातील १७ गावांमधील नागरिकांसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. यात १०१ नवीन शिधापत्रिका, २२१ राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य धनादेश, उत्पन्नाचे १२९ प्रमाणपत्र, ४७ राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, ६७ रहिवासी प्रमाणपत्र, १३ जातीचे दाखले, २ जलतारा योजनांना प्रशासकीय मान्यता, तसेच आधार नोंदणी व दुरुस्ती सेवा देण्यात आल्या. एकात्मिक बालविकास विभागामार्फत २ लाभार्थ्यांना बेबी कीट वितरित करण्यात आले.
सदर शिबिरात सुमारे ४०० ते ४५० नागरिकांनी सहभाग नोंदवून समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळ अधिकारी व्ही. पी. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.