गटारीचं पाणी पिऊन जिवंत राहा – असं म्हणायचयं का तुषार नेरकरांना?
दीड वर्षांपासून लिकेज शोधू न शकले पालिकेचे अधिकारी कर्मचारी ठरले अपयशी!
अमळनेर : विक्की जाधव
शहरातील डीडी नगर, दादासाहेब देशमुख नगरमधील नागरिक दीड वर्षांपासून नळातून येणाऱ्या गटारीसारख्या गडूळ, दुर्गंधीयुक्त पाण्याचा तडाखा सहन करत आहेत. पिण्याचे पाणीच दूषित असल्याने विविध आरोग्यच्या धोक्यांशी झगडण्याची वेळ सामान्य जनतेवर आली आहे.

या प्रकरणात नगरपरिषद आणि मुख्याधिकारी तुषार नेरकर यांची भूमिका अत्यंत निष्क्रिय आणि बेजबाबदार असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. दीड वर्ष उलटून गेलं, तक्रारी झाल्या, समाधान शिबिर झालं, पण लिकेजचा स्रोत अजूनही सापडलेला नाही! हे केवळ दुर्लक्ष नव्हे, तर नागरिकांच्या जीवाशी केलेला खेळ आहे.
मुख्याधिकारींची ‘डेडलाइन’ कधी ?
जनतेचा प्रश्न आहे – इतक्या तक्रारींनंतरही लिकेज कुठे आहे हे समजत नसेल तर पाणीपुरवठा विभागावर आणि मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्यावर कारवाई का होत नाही? प्रशासनाच्या नावाने शंख करणाऱ्या बैठका होत असतील, पण जमिनीवर काम शून्य आहे. “गटारीचं पाणी आम्हाला नको! नेरकर साहेब, आता कृती दाखवा!” असे नागरिक आता बोलू लागले आहेत. प्रशासनाकडून अशा दुर्दशेची अपेक्षा नव्हती. आता वेळ आहे तुषार नेरकर यांनी कार्यालयात बसून आश्वासनं देण्यापेक्षा रस्त्यावर उतरून समस्या सोडवण्याची.
यासंदर्भात शहरातील डीडी नगर भागातील त्रस्त नागरिक पालिकेवर गडूळ पाण्याचा हंडा घेऊन मोर्चा काढणार आहेत असे समजते.
