ज्येष्ठांना सवलतीचा प्रवास, पण रिचार्जसाठी त्रास; NCMC कार्ड म्हणजे ज्येष्ठांसाठी नवी डोकेदुखी..
अमळनेर : विक्की जाधव.
एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी सुरू करण्यात आलेले NCMC कार्ड आता नागरिकांच्या सोयीपेक्षा गैरसोयीचे कारण ठरत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. महिलांना निम्म्या दरात, तर ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा मिळत असली, तरी कार्डसाठी सुरुवातीलाच ₹२०० शुल्क भरल्यानंतर प्रवासासाठी पुन्हा रिचार्जची कसरत करावी लागत आहे. कार्डमध्ये किमान ₹१०० शिल्लक असणे आवश्यक असल्याने सवलतीचा लाभ घेण्यासाठीही नागरिकांना वारंवार बसस्थानक गाठावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची ‘रिचार्जसाठी फेरी’ अधिक त्रासदायक ठरत आहे. प्रवासासाठी सवलत दिली, पण ती मिळवण्यासाठीच वेळ, पैसा आणि श्रम खर्च करावे लागत असतील तर ही सुविधा नेमकी किती ‘सुलभ’? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना केवळ कार्ड रिचार्ज करण्यासाठी बसस्थानकापर्यंत ये-जा करावी लागत असल्याने एसटीच्या सवलतीच्या योजनेचा उद्देशच काही अंशी विस्कळीत होत असल्याची भावना आहे. रिचार्जची किचकट प्रक्रिया सोडा, ‘ऑनलाइन रिचार्ज’चा पर्याय द्या! अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. UPI, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा अन्य डिजिटल माध्यमातून घरबसल्या NCMC कार्ड रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यास लाखो लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. एसटी प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन ऑनलाइन रिचार्जची सुविधा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.