उद्योजकांच्या समस्यांसाठी ‘सिंगल पॉइंट को-ऑर्डिनेशन’; जिल्हाधिकारी कार्यालयात मैत्री सेल सुरू

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-09-02 at 1.22.11 PM

उद्योजकांच्या समस्यांसाठी ‘सिंगल पॉइंट को-ऑर्डिनेशन’; जिल्हाधिकारी कार्यालयात मैत्री सेल सुरू
दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या बुधवारी विशेष बैठक; मैत्री सेलच्या माध्यमातून विभागांमध्ये समन्वय

पुणे, प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

पुणे जिल्ह्यातील उद्योजकांच्या विविध शासकीय व प्रशासकीय समस्या, तक्रारी तसेच प्रलंबित प्रकरणांचे तातडीने आणि कालबद्ध पद्धतीने निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालयात उद्योग तक्रार निवारण कक्ष (Industry Grievance Redressal Cell) आणि मैत्री सेल (MAITRI Cell) कार्यान्वित करण्यात आला आहे. या माध्यमातून उद्योजकांच्या समस्या थेट ऐकून घेऊन संबंधित शासकीय विभागांशी समन्वय साधत त्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर प्रभावी यंत्रणा उभारण्यात आली आहे.

या अनुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक घेण्यात आली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह उद्योग, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, कामगार, ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क, वैधमापन शास्त्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पाटबंधारे आणि पर्यटन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

🟢१३४ तक्रारींचा विभागनिहाय आढावा

बैठकीत विविध शासकीय विभागांकडे प्रलंबित असलेल्या उद्योजकांच्या तक्रारी व समस्यांचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला. सध्या एकूण १३४ तक्रारी प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले.

यामध्ये औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाची १, उद्योग संचालनालयाच्या २, ऊर्जा विभागाच्या ३, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ६, वैधमापन शास्त्र विभागाच्या १३ आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाशी संबंधित तब्बल १०९ तक्रारींचा समावेश आहे.

प्राप्त तक्रारींची विभागनिहाय वर्गवारी करून संबंधित विभागांकडे कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक प्रकरणाच्या कार्यवाहीचा जिल्हास्तरावर नियमित पाठपुरावा केला जाणार असून, प्रलंबित तक्रारींच्या प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेण्यात येणार आहे.

🟡मैत्री सेलमुळे विभागांमध्ये समन्वय

राज्य शासनाच्या MAITRI उपक्रमाच्या धर्तीवर जिल्हाधिकारी कार्यालयात MAITRI Cell कार्यान्वित करण्यात आला आहे. उद्योजकांना विविध शासकीय विभागांशी संबंधित सेवा, परवानग्या, प्रलंबित बाबी आणि प्रशासकीय अडचणींसाठी वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये वारंवार पाठपुरावा करण्याची आवश्यकता भासू नये, यासाठी मैत्री सेलच्या माध्यमातून संबंधित विभागांमध्ये समन्वय साधला जाणार आहे.

उद्योजकांकडून प्राप्त तक्रारींची नोंद घेऊन त्या संबंधित विभागाकडे पाठविण्यात येतील. त्यानंतर संबंधित विभागाशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. प्रकरणाची सद्यस्थिती, झालेली कार्यवाही आणि पुढील कार्यवाही याबाबतही नियमित पाठपुरावा केला जाणार आहे.

🔸पहिल्या आणि तिसऱ्या बुधवारी उद्योजकांसाठी विशेष बैठक

उद्योजकांच्या समस्या थेट ऐकून घेऊन त्यांचे कालबद्ध पद्धतीने निराकरण करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेण्यात येणार आहे.

या बैठकीस संबंधित औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच तक्रार ज्या शासकीय विभागाशी संबंधित आहे, त्या विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे संबंधित उद्योजक किंवा औद्योगिक संघटनेच्या प्रतिनिधीसमक्ष प्रकरणाचा आढावा घेऊन आवश्यक कार्यवाहीबाबत निर्देश देणे शक्य होणार आहे.

मैत्री सेलच्या बैठका दर पंधरा दिवसांनी आयोजित करून प्राप्त प्रकरणांवरील कार्यवाहीचाही आढावा घेतला जाणार आहे.

🔷‘सिंगल पॉइंट को-ऑर्डिनेशन’ची सुविधा

या उपक्रमामुळे उद्योजकांना विविध शासकीय विभागांशी संबंधित समस्यांच्या निराकरणासाठी जिल्हास्तरावर ‘Single Point Co-ordination & Facilitation’ स्वरूपाची सुविधा उपलब्ध होणार आहे. उद्योग, औद्योगिक संघटना, जिल्हा प्रशासन आणि संबंधित शासकीय विभाग यांच्यात प्रभावी समन्वय साधून समस्यांचे जलद निराकरण करण्यावर भर देण्यात येत आहे.

उद्योगांना आवश्यक असलेल्या शासकीय सेवांमध्ये सुलभता आणणे, प्रलंबित प्रकरणांचा वेळेत निपटारा करणे, विविध विभागांमधील समन्वय वाढविणे आणि उद्योजकांसाठी अधिक सुलभ, पारदर्शक, उत्तरदायी व उद्योगपूरक प्रशासकीय व्यवस्था निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

🟢औद्योगिक संघटनांनी सुविधेचा लाभ घ्यावा

पुणे जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटनांनी आपल्या सभासद उद्योजकांना या सुविधेची माहिती द्यावी तसेच त्यांच्या समस्या व तक्रारी योग्य स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

पुणे जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासोबतच ‘व्यवसाय सुलभता’ (Ease of Doing Business) अधिक प्रभावी करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष आणि मैत्री सेलचा सक्रियपणे उपयोग करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

उद्योजकांच्या तक्रारी व समस्या उद्योग तक्रार निवारण कक्ष, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, पुणे येथे सादर करता येणार आहेत. यासाठी दूरध्वनी क्रमांक ०२०-२६१३००९७ तसेच ई-मेल : collector.pune@maharashtra.gov.in वर संपर्क साधता येणार आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!