शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीत सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांचे आवाहन
बारामती(प्रतिनिधी – वर्षा चव्हाण)
दि. ५ ऑगस्ट : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक ही अत्यंत संवेदनशील बाब असून त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट मत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी व्यक्त केले. वाहन चालक आणि मालकांनी वाहतूक सुरक्षेविषयक सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करावी, असेही त्यांनी सांगितले.
बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यातील शालेय विद्यार्थी वाहतूक संघटनांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वाहतूक सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी रविवारी (दि. ३ ऑगस्ट) उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती येथे विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी १०० हून अधिक चालक आणि वाहन मालक उपस्थित होते.
निकम यांनी सांगितले की, शासनाच्या शालेय विद्यार्थी वाहतूक बस नियमावलीनुसार सर्व सुरक्षा नियम पाळणे अनिवार्य आहे. वाहनाचे परवाने, विमा, फिटनेस, प्रदूषण तपासणी प्रमाणपत्र, चालक व वाहकांची माहिती अद्ययावत असणे आवश्यक आहे. ‘स्कूलबस’ची ओळख पट्टी, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग, प्रथमोपचार पेटी, अग्निशामक यंत्र यांसारख्या सर्व सुविधा बसमध्ये असाव्यात, असे त्यांनी नमूद केले.
“शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळण्याचे, शाळेच्या परिसरात वाहन हळू गतीने चालवण्याचे आणि चढ-उतार व रस्ता ओलांडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले. वेगमर्यादा उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी बजावले.
बसचे चालक व वाहक मद्यपान न करणारे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेले असावेत. वाहनांमध्ये कोणतेही बेकायदेशीर फेरबदल करू नयेत. पालकांचा विश्वास जपणे ही वाहतूकदारांची जबाबदारी आहे, असेही निकम म्हणाले.
बैठकीत वाहनांची तपासणी व नियमांची माहिती देण्यात आली. वाहन मालक व चालकांच्या अडचणींचाही आढावा घेण्यात आला.
या वेळी मोटार वाहन निरीक्षक गंगाधर मेकलवार, सहायक निरीक्षक रजत काटवटे, विद्यार्थी वाहतूक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष तानाजी बांदल, उपाध्यक्ष दीपक वाघमारे, जिल्हाध्यक्ष जाहीद बागवान, बारामती तालुकाध्यक्ष गणेश सावंत, दौंड तालुकाध्यक्ष राजू साठे, इंदापूर तालुकाध्यक्ष विशाल कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.